नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका प्रवेश प्रकिया २०२१-२२ राबविण्यात येत असून दि. २९ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रिया कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची व कागदपत्रे पडताळणीची अंतिम तारीख २३ जुलै २०२१ होती. परंतु, सीबीएसई व आयसीएसई बोर्डांचा दहावीचा निकाल अद्याप घोषित झालेला नाही. तसेच एसएससी बोर्डाच्या अनेक विद्यार्थी-पालक यांच्याकडून आवश्यक प्रवेशासंबंधित कागदपत्रांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेस ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेविषयी नव्याने घोषित कार्यक्रमानुसार विद्यार्थी आता शुक्रवार (दि. ३०) पर्यंत ऑनलाइन नोंदणी अर्ज भरून, कागदपत्रांची पडताळणी प्रत्यक्ष (प्रत्यक्ष स्क्रूटणी) किंवा ऑनलाइन (ई- स्क्रूटणी) स्वरूपात करू शकतात. ऑनलाइन नोंदणी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची २ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून विद्यार्थ्यांना ३ ते ५ ऑगस्टदरम्यान यादीतील त्रुटी व कागदपत्रांची पूर्तता करता येईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ व शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांनी दिली आहे.