साकोरा : गेल्या दीड वर्षापासून या गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने काल ऐन स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेसाठी आलेल्या विस्तार अधिकाऱ्यालाच सदस्यांनी व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली. तब्बल दोन तासानंतर ग. वि. अधिकारी यांनी फोनवर पोलीस उपनिरीक्षक जनार्दन तेली यांना मध्यस्थी करून दुसऱ्याच दिवशी नवीन ग्रामसेवक देण्याच्या तोंडी आश्वासनावर विस्तार अधिकाऱ्याची सुटका झाली.काल संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना साकोऱ्यातदेखील सरपंच वैशाली झोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातील स्वातंत्र्यसैनिकांचा शाल-श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महत्त्वाची ग्रामसभा अर्धवट झाली. ग्रामसेवक प्रभारी असल्याने ते या ठिकाणी हजर न राहिल्याने त्यांच्याऐवजी जि.प.चे बांधकाम विभागाचे अभियंता विस्तार अधिकारी म्हणून हजर होते. मात्र ते सर्वांनाच अमान्य झाले. तेवढ्यात आजी व माजी जि. प. सदस्य यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याने उपस्थित दोन गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर सरपंच झोडगे, उपसरपंच अतुल बोरसे, माजी जि. प. सदस्य रमेश बोरसे, देवदत्त सोनवणे, सुरेश बोरसे, अलका कदम, अनिता सोनवणे, संदीप बोरसे, दादा बोरसे, ऊर्मिला निकम व गावकऱ्यांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देत नाही तोपर्यंत विस्तार अधिकारी जे. यू. उशिरे यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवायचे, असे ठरवून त्यांना कोंडून कुलूप लावण्यात आल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली. (वार्ताहर)
साकोऱ्यात विस्तार अधिकाऱ्याला कोंडले
By admin | Updated: August 16, 2016 22:50 IST