नाशिक : महापालिका शिक्षण मंडळाच्या वादग्रस्त प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांना बुधवारी झालेल्या महासभेने मूळ सेवेत परत पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुंवर यांच्याकडून गुरुवारी सकाळी मंडळाच्या कार्यालयात निलंबित मुख्याध्यापक सुरेखा खांडेकर यांना मारहाण झाल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सुरेखा खांडेकर उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या असून, अतिरिक्त आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपआयुक्त दोरकुळकर यांची नियुक्ती करत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी मारहाण केली नसल्याचे म्हटले आहे. बुधवारी झालेल्या महासभेत साडेतीन तासांच्या चर्चेनंतर प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची धूळ खाली बसत नाही तोच गुरुवारी दुपारी निलंबित मुख्याध्यापक सुरेखा खांडेकर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन कुंवर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. खांडेकर यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे, मंडळाच्या कार्यालयात मी बसले असताना कुंवर यांनी ‘तुमच्यामुळे महासभेत माझ्याविरुद्ध ठराव झाला, तुम्ही नगरसेवकांकडे तक्रार करतात काय’ असा जाब विचारत शिवीगाळ व मारहाण केली. याचबरोबर जिवे मारण्याचीही धमकी दिली.
प्रशासनाधिकाऱ्याकडून मारहाण
By admin | Updated: March 20, 2015 00:07 IST