सटाणा/लासलगाव : तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत खुल्या पद्धतीने सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले.गुरुवारी सटाणा व नामपूर बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्यात आले आहे. आज कांद्याला प्रतिक्विंटल ८१९ रुपये सर्वाधिक भाव मिळाला तर सरासरी ७०० रुपये भाव मिळाला. गेल्या ५ जुलैपासून कांदा व्यापाऱ्यांनी अडतमुक्त धोरणाच्या विरोधात बंद पुकारला होता. त्यानंतर ते धोरण स्वीकारले; पण कांदा गोणीमधूनच खरेदी करू, अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत होती. याबाबत बाजार समिती प्रशासनानेही शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्याचे सांगून एकप्रकारे हात वर केल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर काल दिल्लीच्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर व्यापारी संघटनांनी खुल्या पद्धतीने लिलाव करण्याचे मान्य करत आपला बंद मागे घेतला. आज गुरु वारी सकाळी ५ वाजेपासून कांद्याने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. सटाणा व नामपूर बाजार समिती आवारात सरासरी प्रत्येकी दीडशे ट्रॉली कांदा आवक होती. तब्बल दीड महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज सकाळी सव्वाअकरा वाजता बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, उपसभापती विशाल सोनवणे यांच्या उपस्थितीत लिलावास प्रारंभ करण्यात आला. प्रतिक्विंटल साडेचारशे रुपयांपासून पुकारा करण्यात आला.
शेतकऱ्यांमध्ये उत्साह : प्रतिक्विंटल सरासरी ७०० रुपये भाव; बाजार समित्या गजबजल्या
By admin | Updated: August 11, 2016 22:48 IST