नाशिक : महापालिकेने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यापूर्वी रविवारी सिडकोतील परिसरात केलेल्या नमुना सर्व्हेमध्ये ७९० घरांची तपासणी करत माहिती घेतली. याबाबत विश्लेषण करून अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.महापालिकेने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर सर्वेक्षणाचे काम आव्हानात्मक असल्याने आणि खासगी एजन्सींमार्फत होणाऱ्या सर्वेक्षणाचा अनुभव चांगला नसल्याने महापालिकेने प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर नमुना सर्व्हे करण्याचे ठरविले होते. त्यासाठी सिडको विभागातील कामटवाडे, शिवाजी चौक, राणेनगर व मोरवाडी या परिसराची निवड करण्यात आली होती. सदर नमुना सर्व्हे रविवार, दि. ७ फेबु्रवारीला एक दिवसापुरता करण्यात आला. त्यासाठी ५० पथके तैनात करण्यात आली होती. त्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे सहाय्य घेण्यात आले होते. नमुना सर्व्हेमध्ये येणाऱ्या अडचणींचा व प्रती पथक प्रती दिन अंदाजे किती मिळकतींचे सर्वेक्षण करते याबाबत अभ्यास करून मुख्य सर्वेक्षणाच्या कामकाजाची दिशा निश्चित केली जाणार आहे. त्याबाबतचे विश्लेषणाचे काम सुरू असून अंतिम अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
नमुना सर्व्हेमध्ये ७९० घरांची तपासणी
By admin | Updated: February 9, 2016 00:15 IST