नाशिक : दीड वर्षापासून अतिरिक्त कारभार सांभाळत सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व आराखडा तयार करण्याचे काम करणाऱ्या जिल्हा प्रशासनात अखेर शासनाने मेळा अधिकारी म्हणून दोन उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने यासंदर्भातील कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आता शासनाने कुंभमेळा कक्षासाठी मंजूर केलेल्या अन्य पदांवरील कर्मचाऱ्यांच्याही नेमणुकांची प्रतीक्षा आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी कुंभमेळा कक्ष कार्यान्वित करण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे पाठविला होता; परंतु त्याबाबत काहीच निर्णय होत नसल्याचे पाहून या कामाची जबाबदारी जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या कार्यकाळातच प्रत्येक विभागाशी संपर्क साधून सिंहस्थ कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या व त्याचा पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या नियमित कामांचा ताण पाहता, तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. बारा वर्षांपूर्वीच्या कुंभमेळ्यात पाटील यांनी मेळा अधिकारी म्हणून काम केलेले असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यासाठी होईल हे गृहीत धरण्यात आले. तथापि, याबाबत शासन पातळीवरून कोणतेही आदेश अथवा सूचना नसताना पाटील यांनी अतिरिक्त म्हणूनच कुंभमेळ्याचे काम पाहिले. दरम्यान, त्यांची या पदावरून येवला येथे बदली झाल्यानंतर पुन्हा कुंभमेळ्याचे कामकाज कोणी पाहावे, असा प्रश्न निर्माण झाल्याने कामाची गती मंदावली. नंतर मात्र पुन्हा पाटील यांनाच कुंभमेळ्याचे काम पाहावे लागले. राज्य सरकारने व विशेष करून महसूल विभागाने काल केलेल्या बदल्यांमध्ये आता महेश पाटील व उदय किसवे या दोघा उपजिल्हाधिकाऱ्यांची कुंभमेळा कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचीही कुंभमेळा अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याने कुंभमेळ्याशी निगडित दैनंदिन कामकाजाचा आढावा घेणे व सरकार दरबारी पाठपुरावा करणे सहज सोपे झाले आहे. (प्रतिनिधी)