नाशिक : महावितरणने तब्बल चार वर्षांच्या वीज दरवाढीचा एकत्रित प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला असून त्याच्या निषेधार्थ नाशिकमधील उद्योजक आणि व्यापारी शनिवारी (दि. २३) सायंकाळी चार तास वीजपुरवठा बंद ठेवून आंदोलन करणार आहेत.महावितरणने काही दिवसांपूर्वी वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. जवळपास ५६ हजार कोटी रुपयांची दरवाढ आगामी चार वर्षांत करण्यात येणार असून त्यामुळे सर्वच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. विशेषत: घरगुती वीजबिलातही ७० ते ८० टक्के वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आधीच महागाईमुळे मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना वीजबिलाचा मोठा भार सोसावा लागणार आहे. महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीला विरोध करण्यासाठी सोमवारी (दि. २५) विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने नियोजन भवनात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी हरकती आणि सूचना देणार आहेत. परंतु विरोधाची सुरुवात आंदोलनापासून करण्यात येणार असून शनिवारी (दि. २३) सायंकाळी सहा ते दहा या वेळात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी निमा येथे उद्योजक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सनेही विविध व्यापारी संघटनांची बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)
उद्योजक, व्यापाऱ्यांचे आज ब्लॅक आउट
By admin | Updated: July 23, 2016 01:02 IST