नाशिक : साक्षात देवी पार्वतीने पूजलेल्या व्रताचे अनुकरण पारंपरिक पद्धतीने करीत समस्त कुमारिका आणि महिलावर्गाने घरोघरी वाळूची पिंड स्थापन करुन हरितालिका पूजन केले. विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहून महिलांनी हरितालिका पूजनाचे व्रत पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पाडले.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी अर्थात भाद्रपदातील तृतीयेच्या दिवशी हरितालिका पूजन केले जाते. बहुतेक ठिकाणी पार्वती, तिची सखी आणि एक शिवलिंग यांचे मातीचे विग्रह पुजण्याचा प्रघात आहे.
पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरितालिका व्रत असे मानले जाते. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले, अशी त्यामागील कथा सांगितली जाते. त्यामुळे कुमारिकांपासून महिलांपर्यंत हरितालिका पूजतात. शहरातील मंदिरांबाहेर असणाऱ्या शिवपिंडीवर पत्री वाहूनदेखील महिलांनी हरितालिका पूजन केले. पूजनासाठी महिलांनी पारंपरिक साडी परिधान करण्याला प्राधान्य दिले होते.