तळेगावरोही : चांदवड तालुक्यातील काळखोडे येथे रस्त्यावर अतिक्रमण तसेच झुडपे वाढल्यामुळे पाण्याचे टँकर गावात येण्यास अडचण निर्माण होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सरपंच विलास शेळके, संगीता वाघ यांच्या मागणीनुसार गावाला पाणी टॅँकर सुरू करण्यात आला; मात्र काळखोडे मार्गावर काही भागात अतिक्रमण व झाडेझुडपे वाढल्याने टॅँकर गावात जाऊ न शकल्याने अखेर पाणी रस्त्यावरच ओतून द्यावे लागले. टॅँकरला गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने संबंधित अधिकारी व तहसीलदारांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. काळखोडे येथे दुष्काळी परिस्थितीमुळे वाडी-वस्त्यांना पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने पाण्याचा टॅँकर सुरू झाला. रोटेशन पद्धतीने काळखोडे ते समिटरोड दीड किमीपर्यंत जाताना बाजूच्या वस्त्यांना पाणी देण्यात आले. माजी उपसरपंच अण्णा शेळके यांच्या वस्तीपर्यंत पाणीवाटप झाले; परंतु पुढे भास्कर शेळके यांच्या वस्तीजवळ अरुंद रस्ता असल्याने व झाडे, झुडपे तसेच शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. तसेच लाकडे, दगड, वैगेरे रस्त्यात असल्याने दोन वाहने या रस्त्याने जाऊ शकत नाही. टॅँकरचालक महादेव शिरसाठ यांनी भरलेला टॅँकर अगदी रस्त्यावरच खाली केला. कारण चालकानेही यापूर्वी सांगितले होते की, टॅँकर पुढे जाणार नाही. चालकाने प्रसंगावधान राखल्याने अपघातापासून वाचले असले तरी पुढील वस्त्यासाठी पाणी कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
काळखोडे परिसरात अतिक्रमण
By admin | Updated: September 14, 2015 22:31 IST