सिडको : सातपूर-अंबड लिंकरोड परिसरात पुन्हा अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण वाढले असून, याबाबत त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व भागवत आरोटे यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बाजार हटविण्यात यावा यासाठी महापालिका प्रशासन, राज्य शासन उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर महापालिका आयुक्तव प्रशासन यांनी पोलीस आयुक्तांच्या मदतीने अनधिकृत भंगार बाजार हटविण्याची ऐतिहासिक कारवाई केली. शहर भंगार बाजार हटविण्यात काही दिवस उलटत नाही. तोच पुन्हा एकदा भंगार व्यावसायिकांनी याठिकाणी अनधिकृतपणे आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. वास्तविक उच्च न्यायालयाच्या दि. ९ जानेवारी २०१७ च्या आदेशानुसार भंगार व्यावसायिकांनी मनपा हद्दीत व्यवसाय करू नये तसेच भंगार माल हा मनपा हद्दीतून हलविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. या निवेदनावर दिलीप दातीर, पंकज दातीर, नितीन लोखंडे, संतोष गुंजाळ, प्रवीण काटे, गणेश सानप, विशाल काळे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
चुंचाळे शिवारात पुन्हा भंगार बाजाराचे अतिक्रमण
By admin | Updated: March 28, 2017 23:27 IST