नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सोमवारी कॉलेजरोड व त्र्यंबकरोवरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी अनधिकृतपणे उभारलेली दुकाने आणि हॉटेलचे बांधकाम हटविण्यात आले.अतिक्रमण विभागाने त्र्यंबकरोडवरील दलूभाई पटेल कॉलनीतील वासंती अर्पाटमेंटमध्ये श्रीमती संगीता भोसले यांनी सामासिक अंतरात अनधिकृतपणे उभारलेल्या खोलीचे बांधकाम हटविले. त्यानंतर कॅनडा कार्नर येथील निर्मला अपार्टमेंटमधील भूपेंद्रसिंग, सुरेंद्रसिंग आणि लोटस फर्निशिंग यांनी इमारतीच्या सामासिक अंतरात भिंत आणि लोखंडी खांब उभे करत साकारलेल्या तीन दुकानांच्या बांधकामांवरही हातोडा चालविण्यात आला. सदर दुकानांच्या बांधकामांमुळे पार्किंगला अडथळा ठरत होता. कॉलेजरोडवरील युनायटेड आर्केड येथील भोगवटादार भावीन शाह, नवीनचंद्र जोशी आणि विवेक कुकरेजा यांनी इमारतीच्या सामासिक अंतरात लोखंडी अॅँगल्स आणि पत्रे वापरून रेस्टॉरंट उभारले होते. अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता संबंधितांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले, तर उर्वरित बांधकाम मनपाने हटविले. याशिवाय, महापालिकेने पंचवटीतील साई टॉवर्स अपार्टमेंटमधील आशुतोष गोस्वामी यांनी टेरेसमध्ये व बाल्कनीमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेतले. पथकाने दिवसभरात एकूण सात अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही केली. (प्रतिनिधी)
अतिक्रमण हटविले
By admin | Published: July 19, 2016 1:41 AM