र्यंबकेश्वर : बेझे येथील श्रीराम शक्तिपीठाचे धर्माचार्य महंत सोमेश्वरानंद सरस्वती यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक (पदवी प्रदान) सोहळा निरंजनी आखाडा येथे मंगळवारी उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी पुण्यानंदगिरी महाराज होते. या प्रसंगी आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, आवाहन आखाड्याचे सत्येनगिरी महाराज यांच्यासह सर्व आखाड्यांचे साधू-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.बालकानंद महाराज यांनी सोमेश्वरानंद महाराज यांच्या डोक्यावर दुर्वा व पवित्र तीर्थाचा अभिषेक केला, तर निरंजनी आखाड्याच्या रमता पंचच्या सदस्यांनी अभिषेक व मंत्रोच्चारात अखंड पुष्पवृष्टी केली. ब्रह्मवृंदाचे अभिषेक व आशीर्वाद मंत्र पूर्ण झाल्यानंतर सर्व आखाड्यांतर्फे सोमेश्वरानंद महाराज यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुशोभित रथामधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमेश्वरानंद यांनी संपूर्ण त्र्यंबकनगरीत देवदर्शन केले. कार्यक्रमास दहाही आखाड्यांचे साधू-महंत, बेझे येथील सोमेश्वरानंद महाराजांचा भक्त परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व आखाड्यांच्या रमता पंच सदस्यांनी सोमेश्वरानंद महाराज यांना शाल व पुष्पहार देऊन त्यांच्या महामंडलेश्वर पदाला सहमती दर्शविली. सोमेश्वरानंद महाराज यांच्या धर्माचार्य सरस्वती पदवीदान समारंभ यापूर्वी आनंद आखाड्यातर्फे सागरानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता. मात्र, आनंद आखाड्याच्या रमता पंच कार्यकारिणीने यावर आक्षेप घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आजचा पट्टाभिषेक कार्यक्रम उत्साहात पार पडला. (प्रतिनिधी)
सोमेश्वरानंद महाराजांचा पट्टाभिषेक सोहळा उत्साहातत्
By admin | Updated: September 22, 2015 22:59 IST