नाशिक : सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला व इतर प्रमाणपत्रे देण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी सूचना करणारे पत्र नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. सेंट फ्रान्सिस हायस्कूलकडून जानेवारी २०१६ ते मे २०१६ या कालावधीत आकारलेली फी नियमबाह्य असल्याचे सांगत अक्सा अकिल सिमना या विद्यार्थिनीने फी भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी शाळेकडून तिची अडवणूक करण्यात आल्याने तिच्या पालकांनी २७ जून रोजी शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले ैहोते. शिक्षण उपसंचालकांनी या निवेदनाची दखल घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शाळेस अक्सा अकिल सिमना हिचा शाळा सोडल्याचा दाखला देण्याचे निर्देश देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
दाखला देण्यास सेंट फ्रान्सिसकडून अडवणूक
By admin | Updated: July 3, 2016 23:43 IST