नाशिक : गेल्या काही दिवसांपासून होणार होणार म्हणून चर्चेत असलेल्या कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक यांच्या विभागात खांदेपालट झाल्यानंतर काल (दि.१२) बदल झालेल्या विभागात किरकोळ अपवाद वगळता जवळपास सर्वच अधिकारी बदलीच्या जागी हजर झाल्याचे चित्र होते. जिल्हा परिषदेत कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्या बदल्या होऊनही ते जागेवर हजर न झाल्याचे लक्षात येताच मंगळवारी (दि.११) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सर्व कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांना बोलावून नवीन जागेवर तत्काळ हजर व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड इशारा दिला होता. शनिवारी (दि.७) रात्री उशिरा जिल्हा परिषदेतील सहा कार्यालयीन अधीक्षक व आठ कक्ष अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदलाचे आदेश काढण्यात आले होेते. प्रत्यक्षात दोन दिवस उलटूनही खांदेपालटाचे कर्मचारी नवीन नियुक्तीच्या जागी हजर झालेले नव्हते. काही कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांनी प्रशासनाला या महिन्यातील वेतनाबाबत अडचण होण्याची शक्यता असल्याने या महिनाअखेरपर्यंत आहे त्याच जागेवर राहू देण्याची विनंती केली होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी हे म्हणणे फेटाळत वेतनाची अडचण असल्यास आहे त्याच विभागात वेतन घ्यावे व काम मात्र नेमूण दिलेल्या विभागात करावे. शेवटी काम मुख्यालयातच करणे हा मूळ उद्देश असल्याचे सांगत आहे त्या नवीन जागेवर तत्काळ हजर व्हावे, असे आदेश दिले होते. सुखदेव बनकर यांच्या इशाऱ्यानंतर काल (दि.१२) बहुतांश कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक बदलीच्या जागी रुजू झाल्याचे समजते. काही अधिकाऱ्यांनी खासगी कारणास्तव रजा टाकल्याने त्यांना नवीन जागी रुजू होता आले नाही. (प्रतिनिधी)
बदलीच्या जागी अधिकारी झाले हजर कर्मचारी खांदेपालट
By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST