नाशिक : महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीच्या प्रस्तावाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘ब्लॅक आउट’ला अल्प प्रतिसाद मिळाला. निवडक आस्थापना सोडल्या तर औद्योगिक वसाहतीत साप्ताहिक सुटी असल्याने प्रतिसाद मिळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तरीही ब्लॅक आउटला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा व्यापारी आणि उद्योग संघटनांनी केला आहे.महावितरणने आगामी चार वर्षांची एकत्रित वीज दरवाढ करण्यासाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर आता नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून सुनावणी देण्यास आयोगाने प्रारंभ केला असून, सोमवारी (दि.२५) नाशिक विभागाची सुनावणी नियोजन भवनात होणार आहे. त्यामुळे या दरवाढीस विरोध दर्शविण्यासाठी ब्लॅक आउट आंदोलन शनिवारी सायंकाळी सहा ते दहा या वेळात करण्याचे आवाहन करण्यात आले होते. निमा येथे उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी संघटनांची बैठक घेण्यात आली होती. तसेच नागरिकांनादेखील सहभागी होण्याचे आवाहन केले होते. शहरात या आंदोलनाला अल्प प्रतिसाद मिळाला. पदाधिकाऱ्यांनी आवर्जून आपल्या आस्थापनातील दिवे बंद ठेवले होते. मात्र, अन्य ठिकाणी असा प्रतिसाद मिळाला नाही. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत तर शनिवार हा साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने तशाही बहुतांशी कंपन्या बंदच होत्या. त्यामुळे ब्लॅक आउटचा वेगळा परिणाम जाणवला नाही. (प्रतिनिधी)
वीज दरवाढ : सोमवारी नाशकात होणार सुनावणी
By admin | Updated: July 23, 2016 23:40 IST