नाशिक : महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची नावे अखेरीस मंगळवारी राजपत्रात प्रसिद्ध झाली असून, त्यामुळे आता महापौरपदाच्या निवडणुुकीसाठी पुढील कार्यवाही गतिमान होणार आहे. विभागीय आयुक्तांनी तारीख घोषित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने त्यांना पत्र दिले जाणार असून, त्यानुसार १५ मार्चच्या आत निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक गेल्या २१ फेब्रुवारीला पार पडली. या निवडणुकीत १२२ उमेदवार निवडून आले. त्यात ६५ जागा मिळवून भाजपाने बहुमत मिळविले असून, त्यामुळे दरवेळी बहुमताअभावी असलेली चुरस यंदा नाही. त्यातच यंदाचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अर्थात, भाजपाने बहुमत मिळविले असले तरी सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी निवडणूक यंत्रणेवर शंका घेत या निवडीलाच विरोध केला, त्यासंदर्भात शुक्रवारी (दि.३) हे पराभूत उमेदवार आंदोलन करणार आहेत. शिवाय नवनिर्वाचित उमेदवारांची नावे राजपत्रात नगरसेवक म्हणून प्रसिद्ध करू नका, अशी मागणी या उमेदवारांनी सोमवारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे करून त्यास हरकत घेतली होती. परंतु तरीही मंगळवारी राजपत्रात नगरसेवकांची नावे प्रसिद्ध झाली असून, त्यामुळे आता महापौरपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नियमानुसार महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक काढण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. बुधवारी (दि.१) महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात येणार असून, त्यानंतर ते निवडणुकीची तारीख कळविणार आहेत. महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत १५ मार्च रोजी संपणार असून, त्याच्या आत कधीही निवडणुका घेता येतील, असे नगरसचिव ए. पी. वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महापौरपदासाठी लवकरच निवडणूक
By admin | Updated: March 1, 2017 00:59 IST