नाशिक : महापालिका निवडणुकीच्या वेदिवर यंदा सात दाम्पत्य चढले असून, कोणत्या जोडीच्या गळ्यांमध्ये विजयमाला पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत तीन दाम्पत्यांनी महापालिकेत प्रवेश केला होता. यंदा त्यात भर पडते की घट होते, हे येत्या २३ फेबु्रवारीला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत चार दाम्पत्यांनी एकाचवेळी सभागृहात प्रवेश करण्याचा मान मिळविला आहे. त्यात भगवान भोगे-आशा भोगे, विनायक पांडे-अनिता पांडे, तर सन २०१२-१७ या पंचवार्षिक काळात शिवाजी चुंभळे-कल्पना चुंभळे, सुधाकर बडगुजर-हर्षा बडगुजर आणि दिनकर पाटील-लता पाटील या जोडप्यांचा समावेश आहे. एखाद्या पंचवार्षिकला पत्नी तर दुसऱ्या पंचवार्षिकला पती, निवडून जाण्याची अनेक उदाहरणे आहेत, परंतु पती-पत्नी जोडी निवडून जाण्याचा प्रसंग पाच वेळा आलेला आहे. यंदा, तब्बल सात दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये मनसेकडून स्थायी समितीचे सभापती सलीम शेख लढत देत आहेत, तर त्यांच्या पत्नी फरिदा शेख या प्रभाग १० मधून नशीब अजमावत आहेत. प्रभाग २५ मध्ये माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर हे दाम्पत्य पुन्हा एकदा मतदारांना सामोरे जात आहे. प्रभाग १३ मध्ये अपक्ष दत्ताजी वाघ व त्यांच्या पत्नी रेखा वाघ उमेदवारी करत आहेत. प्रभाग २० मध्ये माजी मंत्री व शिवसेनेचे नेते बबन घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप अपक्ष उमेदवारी करत आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या पत्नी सुषमा घोलप यांना प्रभाग २२ मधून चुलत बहीण व माजी महापौर नयना घोलप यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे केले आहे. प्रभाग २२ मधून चैतन्य प्रतापराव देशमुख हे अपक्ष उमेदवारी करत असताना त्यांच्या पत्नी स्नेहल देशमुख यांना मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. प्रभाग २५ मध्ये प्रकाश गिरीधर अमृतकर व चित्रा अमृतकर हे दाम्पत्य अपक्ष म्हणून लढत देत आहे. प्रभाग ३ मध्ये सचिन शिवाजी अहिरे व रोहिणी अहिरे ही जोडी अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहे. या सात जोड्यांमध्ये प्रामुख्याने, पतीराजांची जास्त धावपळ होताना दिसून येत असून, स्वत:बरोबरच सौभाग्यवतीलाही निवडून आणण्याची जबाबदारी वाढली आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक वेदिवर ‘जोडी तुझी माझी’
By admin | Updated: February 15, 2017 00:01 IST