नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला असून, मंगळवारपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात करण्यात येऊन ३० नोव्हेंबर रोजी सकाळी दुपारी २ वाजता नूतन नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील देवळा, निफाड, चांदवड, कळवण, पेठ, सुरगाणा या सहा ग्रामपंचायतींच्या नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर निवडणूक घेण्यात आली. परंतु नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत नसल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात नगराध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले; परंतु दिवाळी सणाच्या शासकीय सुट्या आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलला होता. गुरुवारी सहाही नगरपंचायतींचे नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात मंगळवार, दि. २४ नोव्हेंबरपासून सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नामांकन दाखल करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी अर्जांची छाननी करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल व २७ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. सोमवार, दि. ३० रोजी दुपारी दोन वाजता सर्व सदस्यांची विशेष सभा बोलावून त्यात मतदान घेऊन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.
नगराध्यक्षांची निवडणूक ३० रोजी
By admin | Updated: November 19, 2015 23:41 IST