नाशिक : राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखा परीक्षित लेख्याची प्रत न सादर केल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नाशिकमधील हिंदू एकता आंदोलन, तिसरा महाज आणि जनराज्य आघाडीसह बारा पक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर पक्षाच्या नोंदणी रद्दची टांगती तलवार कायम आहे.राज्य निवडणूक आयोगाने नाशिकमधील हिंंदू एकता आंदोलन पार्टी, नाशिक जिल्हा विकास आघाडी, नाशिक शहर जिल्हा नागरी विकास आघाडी, तिसरी आघाडी मालेगाव, भारतीय बहुजन सेना, जनराज्य आघाडी, स्वावलंबी, भारतीय भूमिपुत्र मुक्ती मोर्चा, नाशिक शहर विकास आघाडी, तिसरा महाज, मालेगाव विकास आघाडी, अधिकार सेना अशा बारा पक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडे सहा राष्ट्रीय, दोन राज्यस्तरीय, ९ इतर राज्यातील राज्यस्तरीय तर ३४० अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. नोंदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षांना नियमितपणे आयकर विवरण पत्र व लेखा परीक्षित लेख्याची प्रत निवडणूक आयोगाला सादर करावी लागते.राज्य निवडणूक आयोगाने गेल्या जून महिन्यात १९ राजकीय पक्षांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर आता या पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. आता ३० डिसेंबरपर्यंत या पक्षांना कागदपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांची नोंदणीच रद्द होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. नाशिकमध्ये सदरचे राजकीय पक्ष असले तरी हिंदू एकता आंदोलन, तिसरा महाज यांसारखे बोटावर मोजता येतील इतकेच पक्ष कार्यरत आहेत. अन्यथा अन्य पक्ष नावाला असल्याने संबंधितांच्या हौसेखातर काढलेल्या पक्षांना फारसा धोका नाही.
नाशिकमधील बारा पक्षांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2015 22:58 IST