सिन्नर : येथील शेठ ब.ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयात पर्यावरणपूरक राख्या बनविण्याची कार्यशाळा राखी पौर्णिमेच्या दिवशी घेण्यात आली. मेळघाटातील आदिवासी बांधवांनी बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तूंचा वापर करुन विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या साकारल्या. अत्यंत हलाखीत जगणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, मेळघाट या संस्थेमार्फत कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना आदिवासी बांधवांनी बांबूपासून बनविलेले विविध साहित्य राख्या बनविण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. स्वदेशीच्या संस्कारासह पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ही मुल्ये विद्यार्थ्यांना मनात रुजविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य नरेंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. बांबूची रंगीत साळ, रंगबेरंगी हॅँडमेड कागद, सूती दोरा व सजावटीसाठी बांबूच्याच बिया यापासून बनविलेली राखी हातातून कुठे पडली तरी बांबूच्या बियांना अंकूर फुटून तुमच्या हातून पर्यावरण संवर्धनाचेच कार्य होणार असल्याचे पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मनोज भंडारी यांनी सांगितले. कलाशिक्षक राहूल मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक राख्या बनवल्या. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक राख्या
By admin | Updated: August 19, 2016 00:26 IST