नाशिक : शहरात एकीकडे ‘कांचन’ची पाने ओरबाडून ‘सोनं’ वाटल्याचा आनंद साजरा केला गेला. दुसरीकडे आपलं पर्यावरण ग्रुप या संस्थेच्या स्वयंसेवकांनी नवा विचार घेऊन ‘नाशिक देवराई’वर आपट्याच्या रोपांची लागवड केली. नवाविचार घेऊन पर्यावरणपूरक दसरा साजरा केला.‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’अशी उक्ती सर्वसामान्यांमध्ये प्रचलित आहे. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या सोनेरी दिवसाला आपट्याची पाने वाटप करण्याची रुढी-परंपरा आहे; मात्र या रुढी-परंपरेकडे नव्या दृष्टीने नव्या विचाराने बघणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शहर व परिसरात कार्यरत असणाऱ्या आपलं पर्यावरण ग्रुपने सातपूर शिवारातील ‘नाशिक देवराई’ (फाशीचा डोंगर) येथे आपट्याची रोपे लावून दसरा साजरा केला. यावेळी जमलेल्या स्वयंसेवकांनी देवराईवरील वाढलेले गवत कापून श्रमदान करत निसर्गाच्या सान्निध्यात दसऱ्याचा आनंद लुटला. यावेळी तरुण, तरुणींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आजही पाळली जाते; मात्र शहर परिसरात आपट्याची मोठी वृक्ष दुर्मीळ झाली आहेत. त्यामुळे आपट्याच्या कुळातील कांचन वृक्षाच्या फांद्या तोडून त्या दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. परिणामी कांचनवरही संकट येऊ लागले असून, पर्यावरणाचा ऱ्हासाला हातभार लागत आहे. त्यामुळे आपटा किंवा कांचनची पाने वाटप करण्याऐवजी मित्र-नातेवाइकांना थेट आपटा, कांचनची रोपे वाटण्याची गरज आहे. वनमहोत्सवाला सुमारे दीडशे आपट्यांची रोपे देवराईवर लावण्यात आलेली आहेत, असे आपलं पर्यावरण ग्रुपचे संस्थापक शेखर गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘देवराई’वरील रोपे बहरली
नाशिककरांनी ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर देवराईवर एकत्र येऊन सकाळी आठ ते रात्री सात वाजेपर्यंत सुमारे अकरा हजार रोपे लावून वनमहोत्सव साजरा केला होता. या रोपांच्या लागवडीच्या कार्यक्रमापासून तर तीन वर्षांपर्यंत संवर्धनाची जबाबदारी आपलं पर्यावरण ग्रुपने स्वीकारली आहे. सध्यस्थितीत देवराईवरील पर्यावरणपूरक प्रजातीची रोपे चांगलीच वाढली आहेत. ११ हजार रोपांपैकी जवळपास सर्वच रोपे जगली असून, त्यांची चांगली वाढ होत आहे. रोपट्यांच्या संवर्धनासाठी या ग्रुपच्या सदस्यांकडून नित्यनेमाने परिश्रम घेतले जात आहे.