सिन्नर: तालुक्यातील वावी येथून मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास मेन रोडवर दुकानासमोर उभी केलेली इको कार एमएच १५/ एचएम २०६७ चोरी झाल्याची घटना घडली. चोरीचा सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वावी येथील भांडी व्यापारी धनंजय दोडे यांच्या मालकीची ही कार होती. बोलेरो जीप मधून आलेल्या तिघांनी कारच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले. नंतर काही अंतरावर ढकलत नेऊन कार सुरू करून त्यांनी पोबारा केला. हा सर्व प्रकार दोडे यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सकाळी या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येत माहिती घेतली. राखाडी रंगाची ही कार असून तिच्या पुढील काचेवर मंगलमूर्ती तर पाठीमागच्या काचेवर श्लोक आणि शौर्य ही नावे लिहिलेली आहेत.
वावी येथून इको कारची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST