नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीवरून स्थायी समितीच्या बैठकीत गोेंधळ उडाला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे आरोप तपासून ३१ मार्चच्या आत शाळांना बेंचेसचा पुरवठा करावा, असे आदेश अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी दिले.स्थायी समितीची बैठक जुन्या रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच विभागांचा आढावा घेत असताना पशुसंवर्धन विभागामार्फत करावयाच्या साहित्य खरेदीबाबत विजयश्री चुंबळे यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिक बागुल यांना विचारणा केली. शासनाचा पुरवठादारासोबत आॅगस्टपर्यंत दरकरार असल्याचे सांगून लवकरच पुरवठा करण्यात येणार असल्याचे डॉ. बागुल यांनी सांगितले. सभापतींचे लक्ष नसल्याकडेही चुंबळे यांनी लक्ष वेधले. शैलेश सूर्यवंशी यांनी मागील खरेदीबाबत नेमलेल्या चौकशी समितीचे काय झाले.? चौकशी कुठपर्यंत आली? याची विचारणा केली. आरोग्य विभागाचा ४० टक्के निधी खर्च झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिली. त्यावेळी आरोग्याचा निधी वेळेत खर्च होणार नसेल तर तो अन्यत्र वळवायचा का? अशी पुस्तीही सदस्यांनी जोडली. गोरख बोडके व शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीची माहिती सदस्यांना का होत नाही? तो निधी परस्पर का खर्च केला जातो? याची विचारणा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी या निधीची आधीच्या वर्षात फॉर्म १४ नुसार मागणी केली जाते? त्यानुसारच निधी वितरीत होतो. विहित नमुन्यात फॉर्मनुसार मागणी केली तर येथे चर्चाच होणार नाही. जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे नगरपंचायत / नगरपरिषदा यांच्यात रूपांतर होणार असून, तशी कार्यवाही सुरू झाल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली. प्रवीण जाधव यांनी समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येणारी दोेन कोटी रुपयांची बेंच खरेदी एकाच व्यक्तिला देण्यासाठी ई-निविदा असूनही त्यात तशा अटी-शर्ती टाकण्यात आल्याचा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी केली. प्रशांत देवरे व समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी ३१ मार्चच्या आत ही खरेदी करावी, अशी सूचना केली. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी नियमानुसार तीन निविदा आल्या असून, त्यानुसारच खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सुखदेव बनकर यांंनी सदस्यांचे आरोप तपासून त्यानंतर खरेदीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.याचवेळी प्रवीण जाधव यांनी चांदोेरी (निफाड) येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत अपहार झाल्याचा आरोप माजी सदस्य उत्तम गडाख यांनी केला असून, तसे पत्रच प्रशासनाला देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला. कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी या योजनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली असून, बुधवारी(दि.२५) ही समिती चौकशीसाठी चांदोरीला जाणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी गोरख बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातही ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील अपहाराच्या चौकशीसाठी तालुक्यातील नागरिक येथे उपोषणाला बसले होते, त्याचे काय झाले? अशी विचारणा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी नाशिक, पेठ, इगतपुरी व निफाड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनामधील असलेल्या आरोपांची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश प्रकाश नंदनवरे यांना दिले. यावेळी बैठकीस सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, किरण थोरे, सदस्य रवींद्र देवरे, प्रशांत देवरे, गोरख बोडके, प्रवीण जाधव, बाळासाहेब गुंड, शैलेश सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
ई-निविदा तपासण्याचे आदेश : कृषी-पशुसंवर्धनच्या खरेदीवरही चर्चा
By admin | Updated: March 23, 2015 23:36 IST