त्र्यंबकेश्वर/नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्यावर रविवारी (दि़ १२) मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेलेला व पाण्यात सूर मारलेल्या सिडकोतील युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या युवकाचे नाव दुर्गेश अनिल सुबंध (वय २०) असे असून, तो सिडकोतील शिवाजी चौकातील रहिवासी आहे़ त्र्यंबकेश्वर पोलिसांनी रविवारी सायंकाळपर्यंत या युवकाच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधार व जंगल परिसर असल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते़ सोमवारी (दि़ १३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुर्गेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला़त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको शिवाजी चौकातील दुर्गेश सुबंध हा युवक त्याच्या आठ-दहा मित्रांसमवेत रविवारी दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी गेला होता़ तेथे या सर्वांनी धबधब्याजवळील पाण्यात अंघोळही केली़ दुर्गेशने मित्रांसमवेत धबधब्याच्या पाण्यात सूर मारली; मात्र पुन्हा वर आलाच नाही़ यामुळे घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली़ या घटनेनंतर पोलीस दुर्गेशच्या तपासासाठी दुगारवाडीला पोहोचले़ त्यांनी दुर्गेशचा शोध घेतला; मात्र तो न सापडल्याने तसेच अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले़ सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सापगावचे सरपंच, पोलीसपाटील व स्थानिक युवक यांच्या मदतीने दुर्गेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला़ बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नुकताच तो एका कंपनीत कामास लागला होता़ त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)
दुगारवाडी धबधब्यात बुडून सिडकोतील युवकाचा मृत्यू
By admin | Updated: July 13, 2015 23:11 IST