नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांचा पाठलाग करून अटक केली आहे़ सागर गणपत बोडके (१९), प्रकाश गुलाब रणमाळे (१८, रा. दोघेही फुलेनगर, पंचवटी) व आदित्य श्याम पाटील (१९, रा. गिरणारे) अशी या तिघा संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून गावठी कट्टा, काडतूस तसेच दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ठक्कर बाजार ते सीबीएस परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने संशयित फिरत असल्याची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोनोने व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी या परिसरात गस्त घालत होते़ हीरो होंडा शाईन दुचाकीवर (एमएच १५, एफजे ३७४२) तिघे जण संशयास्पररीत्या फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी पळ काढला़ यानंतर पोलीस वाहनाने या तिघांचाही पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले़ या तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, फायटर, लोखंडी सुरा, मिरची पूड असा ऐवज त्यांच्याकडे होता़ याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे़
दरोड्याच्या तयारीतील संशयितांकडून गावठी कट्टा जप्त
By admin | Updated: March 18, 2017 20:51 IST