नाशिकरोड : केंद्रीय अर्थखात्याचे सचिव शक्तिकांता दास यांची खासादर हेमंत गोडसे व मुद्रणालय मजदूर संघाचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन मुद्रणालयाच्या समस्या, प्रश्न यासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले. मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने दास यांच्याशी चर्चा करून यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएनपी प्रेसमध्ये रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाकडून २००५ सालापासून नोटा छपाईचा देण्यात येणारा दर २०११ पर्यंत एकसारखा होता. मात्र त्यानंतर रिझर्व बॅँकेने त्यांच्या दोन कारखान्यांच्या नोटा उत्पादन खर्चाची तुलना करून २०११ पर्यंत देण्यात येणाऱ्या दरापेक्षा कमी दर केले. सीएनपीने उत्पादन वाढवून सुद्धा दर कमी केल्याने मुद्रणालय तोट्यात दाखविण्यात आले. सीएनपी प्रेस स्थापन होत असताना वर्कशॉप, दवाखाना त्यामध्ये सामील होता. मात्र रिझर्व बॅँकेच्या कारखान्यात वर्कशॉप, दवाखान्याचा समावेश नाही. कच्चा माल, पेपर, शाई, वीजबिल, टॅक्स याची दिवसेंदिवस वाढत चाललेली किंमत लक्षात घेऊन नोटा छपाईचे दर वाढवून देण्यात यावे, सीएनपीमध्ये इंटॅग्लो छपाईची क्षमता कमी आहे. त्यामुळे ठराविक उत्पादन करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. मुद्रणालय महामंडळाने पदोन्नती धोरणाला अंतिम मंजुरी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चर्चेत खासदार हेमंत गोडसे, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष माधवराव लहांगे, सुनील आहिरे आदिंनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
चुकीच्या निकषामुळे चलार्थपत्र मुद्रणालय तोट्यात
By admin | Updated: November 7, 2015 22:14 IST