रेडगाव खुर्द : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने एक टक्कादेखील पेरणी होऊ शकली नाही. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा दीड टक्का म्हणजेच साडेपाच मि.मी. पाऊस झाला आहे. दिवसेंदिवस चारा व पाण्याची भीषण टंचाई वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.यंदा पावसाळ्याच्या दीड महिन्यात ऊन - सावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वारा यापेक्षा वेगळा अनुभव आला नाही. पंधरा दिवसांपूर्वी काही गावांत पावसाने थोडीशी हजेरी लावली. त्यावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. तरी पेरणीचे क्षेत्र अद्याप एक टक्क्याच्या आतच आहे. गत तीन-चार वर्षांपासून पावसाची अनियमितता व अत्यल्प हजेरीमुळे नदी-नाले कधीच कोरडे झाले आहे. मागील वर्षी खरीप कसाबसा तर पाण्याअभावी रब्बीला रामराम करावा लागला होता. पावसाने यापूर्वीच्या सर्व अनुभवांना चकवा देत तब्बल दीड महिना उलटूनही डोळे वटारलेले असल्याने सध्या साठवलेले पाणी अन् चारा संपल्याने विशेषत: वाड्या -वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. सध्या विकत पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. महिनाभरापासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी गंगा काठच्या भागातून पशुधन जगवण्यासाठी साडेतीन ते चार हजार रु पये गुंठा दराने ऊस खरेदी करावे लागत आहे. मागील दोन वर्षांत ठिकठिकाणी दूध संकलन केंद्र झाल्याने अनेकांकडे दुभती जनावरे आहे. त्यानांही चारा-पाण्याचा प्रश्न भेडसावत असून, दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. (वार्ताहर)
चांदवड तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद
By admin | Updated: July 21, 2014 00:55 IST