मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात बिबट्याने एका कालवडीचा फडशा पाडल्याची घटना घडली. गेल्या तीन-चार दिवसांपासून दातलवाट परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.दातलवाट परिसरात बबन शिंदे हे रविवारी आपल्या मक्याच्या शेतात खत टाकण्याचे काम करत असताना जवळच अवघ्या काही फुटांच्या अंतरावर बिबट्या झोपला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घाबरलेल्या शिंदे यांनी काम तसेच टाकून घर गाठले. वनविभाग व पोलीसपाटील दीपक गाडेकर यांना बिबट्याची माहिती दिली. मंगळवारी विजय सुभाष शिंदे यांनी आपले दोन बैल व तीन वासरे चरण्यासाठी देवनदीलगत बांधली होती. दातलवाट परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची वस्ती असून, अनेक जनावरे मोकळी बांधलेली असतात. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पोलीसपाटील गाडेकर, शेतकरी बबन शिंदे, बाळू शिंदे, संदीप सिरसाट, विजय शिंदे, भरत सिरसाट, वाल्मीक सिरसाट, ज्ञानेश्वर सिरसाट, रवींद्र शिंदे, सरपंच कमल जाधव, उपसरपंच शिवाजी सिरसाट, ग्रामपंचायत सदस्य गोविंद माळी, गणपत माळी, संतोष कदम, ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे. मृत कालवडीचा वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला आहे. (वार्ताहर)
मुसळगाव शिवारात बिबट्याची दहशत
By admin | Updated: August 17, 2016 23:59 IST