लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील प्रभाग २९ मधील ड्रेनेज समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, प्रभागात रोजच ड्रेनेज तुंबत असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त होत आहेत. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने जोरात पाऊस झाल्यावर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेज तुंबण्याचे प्रमाण एवढे वाढलेले असतानाही मनपाचा ड्रेनेज विभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडको प्रभाग २९ मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडत आहे. याबाबत अनेकदा नागरिक हे मनपा तसेच प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रारी करतात. प्रभागातील उत्तमनगर, राणेनगर, साईबाबानगर, दत्त चौक, स्वामी विवेकानंदनगर, राजरत्ननगर या भागांत मोठ्या प्रमाणात ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मनपाच्या वतीने ड्रेनेज लाइन टाकल्या असून, आज याठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली असून, या जुन्या पाइपलाइन या खराब झाल्या असल्याने त्या त्वरित बदलणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ड्रेनेज तुडुंब भरून त्यातील खराब व दुर्गंधीयुक्त असलेले पाणी हे थेट नागरिकांच्या घरांत शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागातील संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था खराब झालेली असून, प्रभागातील सर्व जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलून त्याठिकाणी मोठ्या व्यासाच्या नवीन लाइन टाकल्यानंतरच हा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. एकूणच प्रभाग २९मधील ड्रेनेज समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, याबाबत मनपाच्या संबंधित विभागाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा प्रभागातील महिलावर्गाकडून व्यक्त केली जात आहे.प्रभागातील ड्रेनेज समस्या ही गंभीर बाब असून, याबाबत पाठपुरावा सुरू आहे. प्रभागात दररोजच ड्रेनेज तुंबल्याच्या तक्रारी येत असून, त्या मनपाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रभागातील ड्रेनेजलाइन ही अत्यंत जुनी असल्याने जीर्ण झाली आहे. त्यामुळे पुन: पुन्हा त्याच त्या तक्रारी येत आहे. यामुळे सर्वप्रथम प्रभागातील जुन्या लाइन बदलून त्याठिकाणी टप्याटप्याने नवीन मोठ्या व्यासाच्या लाइन टाकणार- छाया देवांग, नगरसेवक
घरांमध्ये शिरते ड्रेनेजचे पाणी
By admin | Updated: July 16, 2017 00:03 IST