नांदगाव : नांदगाव शहरास पाणीपुरवठा करताना जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग जाणूनबुजून शहरास वेठीस धरत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. गुरुवार, दि. २० आॅक्टो. रोजी सुरू करण्यात येणारे आवर्तन शनिवार उजाडला तरीही सुरू झाले नाही. जलवाहिनी लिक झाल्याने पाणीपुरवठा लांबणीवर पडल्याचे कारण जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले. म्हणून नगरपरिषदेचे पुरवठा निरीक्षक राजू गरुड गिरणा योजनेच्या न्यू पांझण येथील जलशुद्धीकरण यंत्रणेकडे काही कर्मचाऱ्यांबरोबर गेले. तेव्हा तिथल्या पंपाद्वारे ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जलवाहिनीची गळती सुरू असेल तर पंप कसे सुरू आहेत याची विचारणा करणाऱ्या गरुड यांना तेथील कर्मचारी कासारे यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. जि.प. पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता बोरसे यांनी जलवाहिनी लीक असल्याने नांदगाव शहरास उशिराने पाणीपुरवठा सुरू होईल असे गरुड यांना सांगितले होते. यामुळे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग मुद्दाम असे करत असल्याची तक्रार गरुड यांनी दिली. जिपच्या पाणी पुरवठा विभागाकडून नेहमीच सबब पुढे करुन उशीराने पाणी पुरवठा केला जातो. त्याची कारणे खंडित वीज पुरवठा ,पाईप लाईनची गळती अशी देऊन नांदगावकरांना गप्प केले जाते. गरुड यांच्या गिरणा भेटीमुळे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने यापूर्वी पुढे केलेल्या कारणांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (वार्ताहर)
पाणीपुरवठा करताना दुजाभाव
By admin | Updated: October 23, 2016 22:52 IST