नाशिक : गंगापूररोडवरील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांसोबत रस्त्यालगतच्या झाडांवरही बुलडोझर चालविण्यात येत असल्याचा दावा वृक्षप्रेमींनी मनपा आयुक्तांकडे बैठकीत केला. आयुक्तांनी सोमवारी (दि.३) गंगापूररोडवरील वृक्षतोडीच्या कार्यवाहीचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन बैठकीप्रसंगी दिले.गंगापूररोडवरील वृक्षतोडीच्या कार्यवाहीमध्ये रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांसह ज्या वृक्षांचा वाहतुकीला अडथळा नाही, अशा झाडांवरही कुऱ्हाड चालविली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी कोणतेही झाड तोडू नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना मनपाकडून शनिवारी रात्री गंगापूररोडवरील काही झाडे तोडण्यात आल्याचा दावा वृक्षप्रेमींनी केला आहे. याबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी वृक्षप्रेमी आश्विनी भट, भारती जाधव, योगेश शास्त्री, जसबीर सिंग आदिंनी रविवारी (दि.२) आयुक्त अभिषेक कृष्ण यांची निवास्थानावर भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत वृक्षप्रेमींनी आयुक्तांकडे तक्रार करत नियमबाह्यपणे वृक्षतोडीची कार्यवाही होत असल्याचे सांगत आपण तातडीने याबाबत पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. गंगापूररोडवरील रस्त्याच्या क डेला असलेल्या झाडांवरही बुलडोझर चालविण्यात आल्याचा प्रकार वृक्षप्रेमींनी शनिवारी (दि.१) रात्री उघडकीस आणला. बहुतांश झाडे रस्त्याच्या कडेला असूनदेखील न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून सर्रासपणे बेकायदेशीरपणे रात्रीच्या वेळी झाडांच्या मुळावर घाव घातला गेला. सदर बाब वृक्षप्रेमींना समजल्यानंतर तातडीने त्यांनी आनंदवली ते सोमेश्वरपर्यंत पाहणी करून रात्रीच्या वेळी झाडे तोडणे बेकायदेशीर असल्याचे संबंधितांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र याबाबत कर्मचाऱ्यांकडून व मजुरांकडून अरेरावी व शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार कृष्ण यांच्याकडे वृक्षप्रेमींनी बोलताना केली.
गंगापूररोडवरील वृक्षतोडीचे सर्वेक्षण करणार
By admin | Updated: April 3, 2017 01:18 IST