सोयगाव : मालेगाव शहरातील सोयगावचा डी. के. चौक ते टेहरे फाटा रस्त्यावर अनेक दिवसांपासून प्रलंबित भुयारी गटाराचे काम सुरु आहे. पावसाळ्यात गटाराचे काम सुरु केल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे कामात अधिकच व्यत्यय येत आहे, यामुळे कामाचा दर्जाही खालावतो आहे. भुयारी गटारामुळे समस्या सुटतील की अधिक वाढतील, याबाबत नागरिक शंका उपस्थित करत आहेत.
दौलत नगर, पार्श्वनाथ नगर, तुळजाई कॉलनी, जयराम नगर या परिसरातील सर्वाधिक पाऊस, पाण्याचा निचरा करण्याचे या योजनेत नियोजन दिसत नाही. डी. के. चौक ते टेहरे फाटा रस्त्याची चाळण झाली असून, तारेवरची कसरत करत नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतात. एखादा अनुचित प्रकार घडून अनेकांना प्राण गमवावे लागतील, याची दखल घेऊन या समस्येवर संबंधितांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.