नाशिक : जिल्ह्णाची खरीप हंगामाची नजर पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, खरिपाच्या एकूण १६७७ गावांपैकी १३६८ गावांच्या पिकाची पैसेवारी ५० पैशांच्या आतील असल्याने जिल्ह्णातील पीक उत्पादनाला कमालीचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासन आता काय दिलासा देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरीस दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपाची पेरणी करण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेत पेरणी केली; परंतु पावसाने सलग तीन महिने दडी मारल्यामुळे ज्या पिकांची पेरणी झाली ते पाण्याअभावी नष्ट झाले, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले. जिल्ह्णात खरीप हंगामावर अधिक जोर व शेतकऱ्यांचीही आशा लागून असते; परंतु पावसाने पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण हंगामच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनानेदेखील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून खरीप हंगामाच्या नजर पैसेवारीचा आढावा घेतला असता त्यात ही बाब स्पष्ट झाली. जिल्ह्णातील एकूण १९६० गावांपैकी १६७७ गावे खरिपाची असून, रब्बीची फक्त २८३ गावे आहेत. सद्यस्थितीत खरिपाची नजर पैसेवारी पाहता १३६८ गावांमधील पिके ५० पैशाच्या आतील असून, ३०९ गावांमध्ये ५० पैशांच्या वर पैसेवारी आहे. पाऊस न पडल्याचा सर्वाधिक फटका चांदवड, बागलाण, देवळा, येवला, सिन्नर, दिंडोरी, पेठ, मालेगाव, नांदगाव व सुरगाणा या तालुक्यांना बसला असून, येथील खरिपाच्या सर्वच्या सर्व पिकांची पैसेवारी ५० पैशांच्या आतील आहे. नाशिक , इगतपुरी व त्र्यंबकेवर या तीन तालुक्यांत मात्र पिकांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या वर आहे.
जिल्ह्याची खरीप हंगाम नजर पैसेवारी जाहीर
By admin | Updated: September 15, 2015 23:07 IST