नाशिक : वादग्रस्त कारकिर्दीमुळे चर्चेत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे़ त्यांच्या बदलीचे आदेश आरोग्य संचालनालयाने काढले असून, ते आरोग्य उपसंचालकांना प्राप्त झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे़ त्यानुसार माले यांची उस्मानाबादला बदली झाली असून, त्यांच्या जागी साताऱ्याहून डॉ़ सुरेश पी. जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात माले यांच्या बदलीची चर्चा होती़गेल्या बुधवारी (दि़२३) परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील सुप्रिया माळी या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यानंतर संतप्त पालकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ माले यांना परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील गैरव्यवस्था, आरोग्याकडील दुर्लक्ष याबाबत जाब विचारून मारहाण केली होती़ तसेच या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर पालकमंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक आमदारांनी दखल घेतल्यानंतर चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीचीही नेमणूक करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे़जिल्हा रुग्णालयातील प्रलंबित मेडिकल बिलाबाबत आमदार डॉ़ जयवंत जाधव यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता़ याबरोबरच रुग्णालयातील वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक केल्याचा आरोपही केला होता़ तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलनेही केली होती़ या सर्व पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या बदलीची आदेश निघाल्याची चर्चा होती़ मात्र, कुंभमेळ्यामुळे यास स्थगिती देण्यात आली होती़ डॉ़ एकनाथ माले यांनी जुलै २०१४ मध्ये जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा पदभार स्वीकारला होता़ त्यांनी आपल्या कारकिर्दीत कायाकल्प योजनेसह अनेक महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य दिले होते़ (प्रतिनिधी)
जिल्हा शल्य चिकित्सक माले यांची उचलबांगडी
By admin | Updated: September 29, 2015 00:07 IST