नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना शिवाजी चुंभळे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला असल्याबाबत सहकारी संस्था जिल्हा विशेष लेखापरीक्षक विभाग वर्ग १ यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पत्र प्राप्त झालेले आहे. त्यासंदर्भात जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांनी चौकशी सुरू केली असून, बाजार समितीस पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात म्हटले आहे की, बाजार समितीच्या सदस्य मंडळाच्या ९ जुलै २०२१ रोजी झालेल्या ठराव क्र. १३ मधील विविध कामकाजाची चौकशी करण्यासंदर्भात या कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. या ठरावात नमूद कामकाजाची तपशीलवार माहिती बाजार समितीकडे मागविण्यात आली आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया, सदर कामास कलम १२ (१) नुसार देण्यात आलेली मंजुरी, या कामकाजाची देण्यात आलेली जाहिरात, कामकाज पूर्ण झाल्याबाबत अधिकृत आर्किटेक्ट यांचे दाखले, या कामांबाबत देण्यात येणारे बिलांचे तपशील, ई निविदेसंदर्भातील पूर्ण माहिती, कामकाज पूर्ण झाल्याबाबतचा केलेला स्थळपंचनामा, लिलावात सहभाग घेतलेल्या व्यक्तींची माहिती, कामांकरिता झालेल्या खर्चांबाबत संचालक मंडळाने दिलेले मान्यतेचे ठराव, आदी नमूद माहिती उलटटपाली पाठवावी, जेणेकरून चौकशीच्या कामकाजाला त्वरित सुरुवात करता येईल, असे पत्रात म्हटले आहे. या पत्रावर जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांची स्वाक्षरी आहे.
जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडूनही चुंभळेंची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST