नाशिक : पोलीस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयासाठी देण्यात येणार असून, या जागेचे शुक्रवारी (दि़१०) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सीमांकन करण्यात आले़ सार्वजनिक बांधकाम विभाग हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करणार असून, येत्या गुरुवारी (दि़ १६) या जागेचे हस्तांतरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़ जिल्हा न्यायालयात दिवसेंदिवस वाढत जाणारे खटले, पक्षकार व वकिलांची संख्या लक्षात घेता सद्यस्थितीतील जागा अपुरी पडत होती़ त्यामुळे जिल्हा न्यायालयालगत असलेल्या पोलीस मुख्यालयाची पाच एकर जागा न्यायालयास मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अॅड़ का़ का़ घुगे यांनी जनहित याचिका दाखल केली होती़ या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडे सुनावणी झाली़ पोलिसांच्या ताब्यातील पाच एकर जागा मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे़न्यायालयीन जागेसंदर्भात गृह विभागाने चर्चेद्वारे हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला़ त्यामध्ये मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह व विधी विभागाची संयुक्त बैठक घेऊन जागेच्या हस्तांतरणास संमती दिली. त्यानुसार पोलीस मुख्यालयाच्या ताब्यातील पाच एकरपैकी तूर्तास अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयास देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या ताब्यातील अडीच एकर जागेचे सीमांकन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी हे सीमांकन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे, न्यायाधीश एन. के. ब्रह्मे, याचिकाकर्ते अॅड. घुगे, वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके, अॅड. जयंत जायभावे आदिंसह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हा न्यायालय : पोलीस मुख्यालयाची जागा; न्यायालय परिसराचा होणार विस्तार
By admin | Updated: March 13, 2017 01:46 IST