नाशिक : जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर पॅनल निर्मिती व त्यातील उमेदवारांची चाचपणी पॅनल प्रमुखांनी सुरू केली असून, त्यातही केंद्रात व राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर पॅनल बनविताना राजकीय संबंधांना अधिक महत्त्व दिले जात आहे. शनिवारी दिवसभर यासंदर्भात विविध बैठका व संपर्क साधण्याचे काम सुरू होते. जिल्हा बॅँकेसाठी तीन पॅनल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यात कोकाटे-पिंगळे गटाचे पारड्याकडे इच्छुकांचा कल अधिक आहे. पॅनलचे नेतृत्व करणारे नेते व त्यांचा राजकीय पक्ष पाहता, भाजपा-राष्ट्रवादी असा राजकीय रंग या पॅनलला मिळणार आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, माणिक कोकाटे हे भाजपाचे नेते या पॅनलमध्ये असतील, तर राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे, राजेंद्र भोसले यांना त्या पॅनलमध्ये स्थान दिले जाणार आहे. दुसरीकडे डॉ. सुनील ढिकले यांनीही पॅनल निर्मितीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याने शिवसेनेशी संबंधित उमेदवारांना अधिकाधिक जवळ करण्याकडे त्यांचा कल आहे. हिरे व बच्छाव यांचेही एकत्र पॅनल होईल, अशी अटकळ बांधली जात असली तरी, पॅनल बनविण्याइतके व निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार मिळतील काय हाच खरा प्रश्न आहे. पॅनल निर्मिती व उमेदवार ठरविताना आपले राजकीय वैमनस्य काढून घेण्याचीही व्यूहरचना केली जात आहे.
जिल्हा बॅँक निवडणूक : उमेदवारांची चाचपणी
By admin | Updated: April 26, 2015 01:04 IST