नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून खंडित झालेली आदर्श शिक्षक पुरस्कार योजनेची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण सभापती संजय चव्हाण यांनी घेतला असून यंदा दोन वर्षांचे एकत्रित पुरस्कार जाहीर करून वितरण सोहळा येत्या ५ सप्टेंबरला आयोजित करण्यात येणार आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने यापूर्वी दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असे. अशोक सावंत यांच्या सभापतिपदाच्या कारकिर्दीपर्यंत शिक्षक पुरस्कार प्रदान केले जात होते. मात्र, सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नव्याने शिक्षण समिती गठीत झाली परंतु ती अल्पकाळच टिकली. त्यानंतर शासनाने शिक्षण मंडळ बरखास्तीची कारवाई केली. त्यामुळे गेली तीन वर्षे समितीचे गठणच झालेले नव्हते. त्यामुळे पुरस्कार देण्याची परंपरा खंडित झाली. मागील वर्षी न्यायालयीन लढाईनंतर शिक्षण समिती गठीत झाली आणि समिती महापालिकेच्या कार्यकक्षेत आली. त्यामुळे सभापती संजय चव्हाण यांनी यावर्षापासून पुन्हा एकदा शिक्षक पुरस्कार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवड समिती नियुक्त करण्यात आली असून २ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. येत्या ५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
यंदा शिक्षक पुरस्कारांचे वितरण
By admin | Updated: August 25, 2016 00:36 IST