नाशिक : हरित कुंभ संकल्पनेअंतर्गत कुंभमेळ्याच्या शाही पर्वण्यांच्या औचित्यावर गोदावरीच्या पात्रासह शहर प्रदूषणमुक्त रहावे, यासाठी आलेल्या भाविकांना कापडी पिशव्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी संस्थांकडून वाटप करण्यात आले.कापडी पिशव्यांच्या वापरावर भर देत प्लॅस्टिक पिशव्या टाळण्याचे आवाहन करत स्वयंसेवी संस्थांनी भाविकांच्या हातात कापडी पिशव्या सोपविल्या. जेणेकरून शहरात प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यास मदत झाली; एकीकडे प्लॅस्टिक पिशव्यांवर कापडी पिशव्यांचा उतारा स्वयंसेवी संस्थांनी शोधून काढला असला तरी दुसरीकडे मात्र प्रशासकीय यंत्रणेने पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी पूरक अशी जनजागृती शाहीस्नानाच्या वेळी करण्याकडे सपेशल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.हरित कुंभ समन्वय समितीअंतर्गत नवनिर्मिती बहुउद्देशीय संस्था, शिव कल्याण मंडळ, रमाबाई सामाजिक संस्था, नवनाथपंथी संस्था, स्त्री शक्ती संस्थेसह बहुतांश समाजसेवी संघटनांनी कापडी पिशव्या वाटप करण्याचा विडा उचलला होता. यावेळी तिन्ही पर्वण्यांच्या दिवशी डोंगरे वसतिगृह मैदान, मायको सर्कल, मुंबई नाका, महामार्ग स्थानक, द्वारका चौक, शिवाजी चौक, कथडा, बिटको चौक, निलगिरी बाग वाहनतळ, रविवार कारंजा, नागचौक, पंचवटी, साधुग्राम, तपोवन, मालेगाव स्टॅण्ड, दिंडोरी नाका तसेच गोदाघाट परिसरात भाविकांकडून कॅरीबॅगचे संकलन करत त्यांना कापडी पिशव्यांचे वितरण केले.
९0 हजार पिशव्यांचे वाटप
By admin | Updated: September 23, 2015 22:42 IST