येवला : मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येवल्यात काही दंगलखोर युवकांनी घोषणाबाजी करीत थेट पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या युवकांना प्रथम शांत राहण्याच्या सूचना दिल्या. परंतु युवक काही ऐकेना त्यानंतर सौम्य लाठीमार,अश्रुधूर सोडणे असे प्रयोगही पोलिसांनी केले तरीही दंगेखोर काबुत येत नाहीत हे पाहुन पोलिस अधिकाऱ्यांनी थेट गोळीबार करण्याच्या सूचना दिल्या. हे दृश्य पाहुन रस्त्याने जाणारा येणारांच्या छातीत धस्स झाले. शाळा सुटुन पायी घरी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची भितीने गाळण उडाली. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थती आटोक्यात आणुन ही खरोखरची दंगल नसुन आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांचे प्रात्याक्षिक (मॉक ड्रिल) असल्याचा खुलासा केला अन् अनेकांचा जीव भांड्यात पडला. येवला शहरातील क्रिडासंकुलाच्या मैदानावर मंगळवारी पोलिसांच्या वतीने सायंकाळी ५ वाजता अधिकृतपणे मॉक ड्रिल करण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षा यंत्रणांनी ही परिस्थिती कशी हाताळावी याचे प्रात्याक्षिक म्हणून पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ.राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस निरीक्षक,सोबत पोलीस ताफा आणि ,बॉम्बशोधक पथक,डॉग स्कॉ ड, दंगा काबु यंत्रणा,यांच्या पथकाने, मॉक ड्रील सादर केले. (वार्ताहर)
येवल्यातील क्रीडा संकुलाजवळ दंगल; पोलिसांचा गोळीबार
By admin | Updated: September 7, 2016 01:05 IST