येवला : यंदाच्या पावसाळ्यात मोसमी पावसाने निराशा केल्याने दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या दिवाळीला येथील सेवाभावी संस्थांनी रोषणाईची झालर देत शहरात जब्रेश्वर खुंट ते गणेश मंदिर या मुख्य रस्त्याला प्रथमच दुतर्फा रोषणाई केली असून, महिलावर्गासाठी पणती उत्सवाचेही आयोजन केले आहे. या संस्थांनी लावलेला भव्य आकाशकंदील येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे. येथील खटपट मंच व धडपड मंच या दोन्ही सेवाभावी संस्थांनी शहर व परिसरात या पणती उत्सवाच्या माध्यमातून दुष्कळाच्या सावटाखाली असेल्या दिवाळीच्या वातावरणात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. येथील संत नामदेव मंदिरात खटपट मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने पणती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ५३ महिला व युवतींनी सहभाग घेत आकर्षक पद्धतीने पणती सजवून या पणत्यांभोवती आकर्षक रांगोळ्याही काढल्या. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, शंकरलाल टाक, संतोष खंदारे यांनी स्पर्धेदरम्यान परीक्षकाची भूमिका बजावत १५ वर्षांखालील स्पर्धकात प्रियंका धाकाते, वैष्णवी भुसनळे, पायल एंडाईत यांच्यासह वैष्णवी भिंगारकर, रक्षिता बाबर, अनुजा धकाते यांची निवड केली, तर १५ वर्षांवरील गटात श्रुती नाळके, ज्योती बाबर, कोमल मारवाडी यांच्यासह माया काबरा, भाग्यश्री बाबर, मीनाक्षी क्षत्रिय यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, प्रास्ताविक खटपट मंच अध्यक्ष मुकेश लचके यांनी तर सूत्रसंचलन प्रा.दत्तात्रेय नागडेकर यांनी केले. यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष नंदलाला भांबारे, रमाकांत खंदारे, अमोल लचके, ज्ञानेश टिभे, विशाल तुपसाखरे, श्रीकांत खंदारे, तुषार भांबारे, विनोद बागुल, गणेश लचके उपस्थित होते. (वार्ताहर)
दुष्काळातील दिवाळीला रोषणाईची झालर
By admin | Updated: November 10, 2015 22:47 IST