घोटी : शहरासह सुमारे शंभराहून अधिक महसुली गावाच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या घोटी पोलीस ठाण्यातून मागील काही महिन्यात झालेल्या प्रशासकीय बदलीप्रक्रियेत तब्बल चौदा पोलिसांच्या बदल्या झाल्याने तसेच बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली आवश्यक कर्मचारी न दिल्याने घोटी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सुमारे शंभराहून अधिक महसुली गावातील सव्वा लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या २५ पोलिसांवर आली असल्याने घोटी पोलीस ठाण्याला वाढीव पोलीस बळ मिळावे, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांनी केली आहे. इगतपुरी तालुक्यातील प्रमुख व महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ असलेल्या घोटी पोलीस ठाण्यावर शहरातून गेलेला महामार्ग, व लोहमार्ग आदिंच्या सुरक्षेबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावे तसेच पूर्वेस नगर जिह्याचा काही भाग यांचा भार आहे. आगामी काळात अनेक धार्मिक सण, उत्सव येत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी या पोलीस ठाण्याला अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे, अशी मागणी सर्व पक्षियांसह नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
बदल्यांमुळे घोटी पोलिसांच्या संख्येत घट
By admin | Updated: July 24, 2016 22:03 IST