नाशिक : अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांची व शिक्षकेत्तरांची सुटका करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर द्यावा तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मुंबई येथे मंत्रालयात शिक्षणक्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्नावर ही बैठक होऊन त्यावर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांची व शिक्षकेत्तरांची सुटका करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करावे, केंद्राप्रमाणे मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी द्यावी, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करावे, विनाअनुदानित शाळांना त्वरित अनुदान द्यावे, चिपळूणकर समितीच्या अहवालानुसार त्वरित संचित पदे भरून शिक्षक व शिक्षकेत्तरांना न्याय द्यावा, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करून झालेला अन्याय दूर करावा यासह अनेक प्रलंबित मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मनसेच्या शिष्टमंडळात राज्य अध्यक्ष संजय चित्रे, राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे, हरिष बुरुंगे, प्रा. पुरुषोत्तम रकिबे, सुभाष मेहेर, प्रवीण ताह्मणे, यशवंत किल्लेदार, सुभाष भोईटे, विनायक सुतार, शरद भांडारकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या प्रश्नांवर मनसे शिक्षक आघाडीची शिक्षणमंत्र्यांशी चर्चा
By admin | Updated: March 6, 2015 00:33 IST