पाळे खुर्द : ‘वसाका’ सुरू करण्यासंदर्भात ठेंगोडा येथे बैठक घेण्यात आली. काहींनी राजकीय वळण देऊन बैठकीत कुठलाही विषय होऊ न देता बैठक उधळून लावल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बंद पडलेल्या वसाकाची सर्वात मोठी झळ कळवण व सटाणा तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांना आजही बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वसाकाचे चाके पुन्हा सुरू होण्यासबंधी बैठकीच्या आयोजनामुळे उत्साह निर्माण झाला होता. परंतु बैठक उधळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कळवण व सटाणा हे दोन तालुके ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर अग्रेसर असून, एकट्या वसाकाची ५००० मे. टन गाळप क्षमता, पूर्ण गाळप केले जाणारे ऊस उत्पादन या दोन्ही तालुक्यातून होते. वसाका बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याना आपला ऊस खासगी कारखान्यांना देताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. खासगी कारखान्याची नियमावली नसते नियमबाह्य ऊस दिला जातो, हेलपाटे मारावे लागतात. यामुळे वसाका कार्यान्वित झाला तर कुठलाही त्रास होणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांत आहे. त्यातच बैठक उधळली गेल्याने कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. वसाका सुरू करण्यासंबंधी कृती समितीने बोलावलेली बैठक कोणाच्या श्रेयाची नव्हती. बैठक होती वसाकाच्या अस्तित्वाची. परंतु बैठकीला राजकीय वळण मिळाल्याने वसाकाचे बंद चाके या खेळीने पुन्हा ठप्प झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ऊस उत्पादकांनी बैठक कळवण येथे घेण्याची मागणी कृती समितीकडे करण्यात आली आहे.
‘वसाका’ बैठक उधळल्याने नाराजी
By admin | Updated: July 12, 2014 00:27 IST