सिन्नर : येथील स्टेट बॅँक शाखेने जिल्हा बॅँकेचे धनादेश क्लीअरिंगसाठी स्वीकारण्यास नकार दिल्याने खातेदार व ग्राहकांना गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा बॅँकेमार्फत व्यवहार केले जातात. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅँकेच्या खातेदारांना बसला असून व्यवहार सुरळीत होत नसतांनाच जिल्हा बॅँकेचे धनादेश क्लीअरिंगसाठी स्वीकारले जात नसल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे धनादेश पुढील सूचना येईपर्यंत बॅँकेत जमा करू नये असा फलकच येथील येथील स्टेट बॅँकेने प्रवेशद्वारात फलक लावला आहे. त्यामुळे त्याचा फटका अनेक ग्राहकांना बसला आहे. दरम्यान, नाशिकच्या क्लीअरिंग हाउसकडून जिल्हा बॅँकेचे धनादेश स्वीकारू नये अशा सूचना आल्या असल्याचे स्टेट बॅँकेचे शाखा व्यवस्थापक विद्याधर धामणे यांनी सांगितले. सुरुवातीला २१ मार्चपर्यंत धनादेश स्वीकारु नये अशा सूूचना होत्या. आता मात्र ती मुदत वाढविण्यात आल्याने जिल्हा बॅँकेचे धनादेश क्लीअरिंगसाठी स्वीकारणे आणखी किती दिवस बंद राहील असा सवाल ग्राहकांकडून विचारला जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा बॅँकेचे धनादेश क्लीअरिंगसाठी स्वीकारले जात नसल्याचे समजते. (वार्ताहर)
धनादेश स्वीकारले जात नसल्याने गैरसोय
By admin | Updated: March 23, 2017 22:37 IST