नाशिक : भारत वंचित घटक विविध जातींमध्ये विखुरलेला आहे. मागासलेला घटक म्हणून वंचित समाजाकडे बघितले जाते; मात्र हे वंचित घटक कौशल्यधिष्ठित व भारतीय संस्कृतीची समज आणि तत्त्वज्ञानाची माहिती ठेवणारा आहे. यासमाजाकडे शरीरशास्त्र, खनिजशास्त्र, वास्तुशास्त्र, अलंकारशास्त्र, तत्त्वज्ञान असा चौफेर अभ्यास आहे, असे प्रतिपादन लेखक व सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी केले.शंकराचार्य संकुलात ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ व्याख्यानमालेचे सहावे पुष्प प्रभुणे यांनी शनिवारी (दि.२५) गुंफले. ‘वंचित समाज-भारतीय संस्कृती’ या विषयावर बोलताना प्रभुणे म्हणाले, वंचित जातींकडे ज्ञानाचा भांडार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा-वेरूळ या प्रसिद्ध लेणीचे खोदकाम ‘वडार’ जातीनेच केले असावे, कारण या वंचित जातीतील घटक खोदकामांमध्ये राबतात हे मला वडार जातीच्या एका मुलासोबत लेणी फिरत असताना समजले. निद्रिस्त तथागत गौतम बुद्धांचे शिल्पाचा बारकाईने अभ्यास करत ज्या शिल्पकाराने हे शिल्प घडविले त्याच्या कौशल्य आणि त्याची बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी झालेली एकरूपता माझ्या लक्षात आली. छन्नी-हातोडीने खोदकाम करत शिल्प घडवित असताना त्या शेकडो कारागिरांच्या छन्नीला शेवटून देण्यासाठी त्यावेळी लोहार हादेखील घटक त्या ठिकाणी राबत असेल, यात शंका नाही, असे प्रभुणे यावेळी म्हणाले. असे असंख्य वंचित जातींचे वेगवेगळे प्रवास आहे. प्रत्येक जातीकडे वेगवेगळ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा खजिना आहे. गरज आहे त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघण्याची, असे मत त्यांनी यावेळी मांडले. (प्रतिनिधी)
वंचित समाजाकडे भारतीय संस्कृतीचे सखोल ज्ञान
By admin | Updated: October 24, 2015 23:43 IST