नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्र्यंबकेश्वर येथील पर्वणीसाठी येऊ पाहणाऱ्या भाविकांना नाशिकला वळसा घालून वळणमार्गे त्र्यंबकेश्वरकडे रवाना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामीण पोलीस यंत्रणेने तयार केलेल्या वाहतूक नियोजन आराखड्यात शहर पोलिसांनी खोडा घातल्यामुळे निर्माण झालेला पेचप्रसंग थेट पोलीस महासंचालकांच्या दारीच सोडविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कुंभमेळ्याच्या आयोजनात सारेच काही आलबेल असल्याचे मानण्याचे कारण नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा सर्वच संबंधित खात्यांचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांनी आजवर केलेल्या कामांचे सूक्ष्म नियोजन व त्याची अंमलबजावणीवरच आता भर दिला जात आहे. त्यामुळे दर सप्ताहात होणाऱ्या आढावा बैठकीत प्रत्येक विभागाचे सादरीकरण व त्यावरील अडचणींची चर्चा होऊन तत्काळ मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे. कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी अधिक महत्त्व असल्याने व याच दिवशी भाविकांची संख्या लाखोंच्या घरात जात असल्याने विशेष करून त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठी बाहेरगावाहून व त्यातल्या त्यात औरंगाबाद, पुणे, धुळे व मुंबईकडून खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांना नाशिकमध्ये न येऊ देता, नाशिकला वळसा घालून पर्यायी मार्गाने त्र्यंबकेश्वरकडे वळविण्याचा आराखडा ग्रामीण पोलिसांनी तयार केला. या आराखड्यानुसार त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी अधिकाधिक आडमार्गाचा वापर करून, एकाच रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच रस्त्याची परिस्थिती व त्यामार्गे येणाऱ्या वाहनांची अंदाजित संख्या, असे गणितही मांडण्यात आले. यातील काही रस्ते एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात येणार आहेत. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा यंदा नाशिक-त्र्यंबकरोड चौपदरी झाल्यामुळे या रस्त्याच्या वापराने वाहतुकीची मोठी कोंडी सोडण्यास मदतच होणार असल्याने अधिकाधिक या रस्त्याचा वापर करून घेण्याचेही नियोजन ग्रामीण पोलिसांनी केले. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या दोन्ही पर्वण्या एकाच दिवशी असल्यामुळे साहजिकच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी भाविकांची गर्दी वाढणार आहे, अशा परिस्थितीत फक्त त्र्यंबकेश्वरला जाऊ पाहणाऱ्या भाविकांची गर्दी परस्पर वळविण्याशिवाय पर्यायच नाही, परंतु ती वळवताना उपलब्ध रस्त्यांची क्षमतादेखील महत्त्वाची असल्याचे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.कुंभमेळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आलेले असताना शहर पोलिसांनी घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे भाविकांच्या वाहतुकीचा प्रश्न ग्रामीण पोलिसांना सोडून द्यावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांपुढे हा प्रश्न काढण्यात आला, तत्पूर्वी ज्यावेळी ग्रामीण पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा आराखडा सादर केला त्यावेळी मात्र शहर पोलिसांनी कोणतीही हरकत घेतली नसल्याची बाबही यावेळी चर्चिली गेली; परंतु आता मात्र त्याला होणारा विरोध पाहता, या संदर्भात थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांचेच मत मागविण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली. त्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांचे याबाबत असलेले दावे-प्रतिदावे मागविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
भाविकांची वाहतूक महासंचालकांच्या दारी
By admin | Updated: March 26, 2015 23:52 IST