नाशिक : औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वार्षिक वाङ्मय पुरस्कार घोषित करण्यात आले असून नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांचा त्यात समावेश आहे.मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सदर पुरस्कारांची घोषणा केली. मसापतर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. दोन वर्षांतून एकदा मराठीतील इतिहास, संस्कृती, कला किंवा वाङ्मय मीमांसा करणाऱ्या ग्रंथास देण्यात येणारा नरेंद्र मोहरीर पुरस्कार ‘तुकोबाच्या अभंगाची शैलीमीमांसा’ या ग्रंथासाठी डॉ. दिलीप धोंडगे यांना देण्यात येणार आहे. दिलीप धोंडगे यांना काही दिवसांपूर्वीच प्रतिष्ठेचा विखे पाटील पुरस्कार जाहीर झाला होता. दरम्यान, सुशील धसकटे यांच्या ‘जोहार’ या पुस्तकाला, उल्का महाजन यांच्या ‘कोसळता गावगाडा’ या ग्रंथास तसेच मोहन कुंभार व माधव शिरवळकर यांनाही पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
दिलीप धोंडगे यांना मसापचा पुरस्कार
By admin | Updated: August 12, 2016 23:12 IST