नाशिक : संसदेत आजही राज्यसभा विरुद्ध लोकसभा असे क्रिकेटचे संघ आहेत. मात्र, याची सुरुवात धैर्यशील पवार यांनी केली असून, पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना क्रिकेट पॅड बांधण्यास भाग पाडल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले. गोल्फ क्लब येथे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय खासदार धैर्यशील पवार यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन व बॉलिंग मशीनच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो तेव्हा धैर्यशील पवार राज्यसभा खासदार होते. जेव्हा जेव्हा दिल्लीला जाण्याचा योग येत असे, तेव्हा त्यांच्याकडून राजकारणाबरोबरच क्रिकेटचे अनुभव ऐकावयास मिळत असत. धैर्यशील पवार यांनी जिल्हा क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांचे छायाचित्र प्रदर्शन तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सध्या क्रिकेटमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून, प्रत्येक राज्यातून उत्कृष्ट खेळाडू पुढे येत आहेत. महाराष्ट्राचा विचार केल्यास पूर्वी क्रिकेट पुणे या शहरापुरते मर्यादित होते. मात्र, आता राज्यातल्या कानाकोपऱ्यातून उत्कृष्ट खेळाडू पुढे येत आहेत. त्याकरिता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उत्कृष्टपणे आपली भूमिका पार पाडत आहे. क्रिकेट हा खेळ घरोघरी पोहचल्याने क्रिकेट देशाचा धर्म झाल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभीधैर्यशील पवार यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन व बॉलिंग मशीनचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के, आमदार छगन भुजबळ, सीमा हिरे, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सचिव सुधाकर शानबाग, विनोद शहा, विठ्ठलशेठ मनियार, समीर रकटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास लोणारी यांनी केले. (प्रतिनिधी)
धैर्यशील पवार यांनी जोडला क्रिकेट राजकारणाचा संबंध
By admin | Updated: April 12, 2015 00:43 IST