नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तसेच वेतनातील फरकाची सुमारे ५८ लाख रुपयांची रक्कम बळजबरीने धनादेशावर सह्या करून काढून घेतल्याप्रकरणी गत २५ डिसेंबरपासून न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज सोमवारी (दि़१३) मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी फेटाळला़ यामुळे पिंगळे यांचा कारागृहातील मुक्काम अनिश्चित काळासाठी वाढला आहे़ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या न्यायालयात सोमवारी पिंगळे यांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाचे वकील अॅड. ठाकरे व बचाव पक्षाचे वकील अॅड. शिरीष गुप्ते व अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला़ अॅड़ ठाकरे यांनी आपल्या अर्धा तासाच्या युक्तिवादात न्यायालयात सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांनी केलेल्या या गुन्ह्णाच्या सखोल तपासात पिंगळे यांच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध झाले असून, त्यांचा सहभागही निश्चित झाला आहे़ तसेच बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना पिंगळे यांच्याकडून धमकावले जात असून, याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्णांची कागदपत्रेच अॅड. ठाकरे यांनी न्यायालयासमोर सादर केली़ तसेच अपहाराची आणखी प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता असून जामीन मिळाल्यास या तपासावर परिणाम होणार असल्याचे सांगितले़ सरकारी व बचाव वकिलांचा युक्तिवादानंतर न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला़ उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने पिंगळे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे़ २५ डिसेंबर अर्थात ५१ दिवसांपासून देवीदास पिंगळे हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असून, यातील तीन दिवस प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातही ठेवण्यात आले होते़ उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने पिंगळे यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार किंवा पुन्हा वेगळ्या कारणांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल करावा लागणार आहे़(प्रतिनिधी) घटनाक्रम़़़ * २१ डिसेंबर २०१६ - देवीदास पिंगळे यांना अटक.* २१ ते २५ डिसेंबर २०१६ - न्यायालयाकडून पोलीस कोठडी.* २५ डिसेंबर २०१६ - न्यायालयीन कोठडीत रवानगी़* २६ डिसेंबर २०१६ - जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज. * २८ डिसेंबर २०१६ - जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला.* २४ जानेवारी २०१७ - मुंबई उच्च न्यायालयात दाखल जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली.* ७ फेब्रुवारी २०१७ - मुंबई उच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलली़* १३ फेब्रुवारी २०१७ - मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला़बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे वेतन गैरव्यवहार प्रकरणाचा चौकशीत पिंगळे यांच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध झाले असून, त्यांचा सहभागही निश्चित झाला आहे़ तसेच त्यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते धमकी देत असल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र नोंद करण्यात आल्याचे पुरावेही आम्ही कोर्टात सादर केले़ या पुराव्यांनंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला़- डॉ़ पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, एसीबी, नाशिक़
देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Updated: February 14, 2017 02:06 IST